संत्रा-मोसंबी-लिंबू पिकातील सिट्रस ग्रिनिंग उपाययोजना

 संत्रा-मोसंबी-लिंबू

सिट्रस ग्रिनिंग

सिट्रस ग्रिनिंग

रोगाची लक्षणे बहुधा परिवर्तनशील असतात आणि बहुतांश भागांसाठी विशिष्ट नसतात. बऱ्याचदा सिट्रस ग्रिनिंग रोगग्रस्त झाड आणि जस्त किंवा लोह यांसारख्या खनिजांच्या कमतरतेची लक्षणे सारखीच दिसतात. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो. पिवळा कोंब येणे हे सिट्रस ग्रिनिंग होण्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. पानांवर डाग पडणे हेही (विशेषतः मोसंबी) या रोगाचे सर्वोत्तम निदान लक्षण आहे. रोगाची तीव्रता अधिक झाल्यास पानाचा काही भाग हिरवा राहून बाकी भाग पिवळा पडतो. फांद्या मृत झाल्यामुळे झाडे विरळ दिसतात. रोगग्रस्त फळे आकाराने लहान, कुरूप, चवीला कडू व कमी दर्जाची असतात. अशी फळे बीजविरहित असतात.

🛡 एकात्मिक उपाययोजना

👉 टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड ६०० पीपीएम द्रावणाची ४५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.

👉 झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी २०० ग्रॅम झाडाच्या आळ्यामध्ये दोनवेळा विभागून वापरावे.

👉 रोगप्रसार करणाऱ्या सिट्रस सायला किडीच्या सक्रिय काळात (विशेषतः नवतीचा हंगाम) थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कीडनाशक बदलून करावी.

👉रोगाची लक्षणे दिसणाऱ्या फांद्याची छाटणी करावी. या जिवाणूची हालचाल संसर्ग झालेल्या झाडांमध्ये फार संथगतीने होते. त्यामुळे एखाद्या फांदीमध्ये लक्षणे दिसताच, तेवढीच फांदी त्वरित कापून विल्हेवाट लावावी. जास्त प्रमाणात (५० टक्क्यांपेक्षा जास्त) संसर्ग झालेली झाडे मुळासकट उपटून जाळून टाकावीत. सायला किडींची संख्या कमी असल्यास झाडाची छाटणी करून रोगग्रस्त फांद्या नष्ट कराव्यात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post