हरभरा
पर्णीय रोग व्यवस्थापन
⭕️ करपा रोगकारक बुरशी :
अॅस्कोकायटा रेबी पीक फुलोऱ्यात व घाटे तयार होण्याच्या अवस्थेत असताना रोगाचा प्रादुर्भाव होतो. ढगाळ वातावरण, थंड हवामान आणि हलका पाऊस असल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पानांवर तपकिरी रंगाचे गोलाकार, मध्यभागी राखाडी रंगाचे ठिपके आढळून येतात, त्यामुळे पाने करपून झाडे वाळतात. रोगाची तीव्रता जास्त वाढल्यास खोड कांड्यामध्ये मोडते. रोगाची लक्षणे दिसून येताच, कॅप्टन किंवा क्लोरेथॅलोनील ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
⭕️ भुरी रोगकारक बुरशी :
ओडीओप्सीस पीक परिपक्व अवस्थेत असताना बुरशीची भुरकट, पांढरट रंगाची पावडर पानांवर, फांद्यांवर दिसून येते. रोगग्रस्त पाने, फांद्या, घाटे जांभळट रंगाची होऊन कालांतराने वाळतात. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २.५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल (५० ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनुसार व गरजेप्रमाणे या बुरशीनाशकांच्या आलटून पालटून दोन-तीन फवारण्या कराव्यात.
⭕️ खुजा रोग
हा रोग विषाणूमुळे होतो. रोगग्रस्त झाडावरील पाने नारंगी किंवा तांबूस रंगाची होऊन पिकाची वाढ खुंटते. त्यामुळे फूल आणि घाटेधारणा कमी प्रमाणात होते. हा रोग विषाणूंमुळे होत असल्याने नियंत्रणासाठी हमखास उपाय उपलब्ध नाही. उभ्या पिकातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. विषाणूवाहक मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.