केळी आठवडी सल्ला | बागेचे व्यवस्थापन |

 केळी

बागेचे व्यवस्थापन 

👉 अतिवृष्टीबरोबरच वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटतात. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रियेचा वेग मंदावतो. तसेच वाऱ्यामुळे झाडे कोलमडूनही फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी केळी बागेभोवती दोन मीटर अंतरावर सजीव कुंपणाच्या दोन ओळी केळी लागवड करतेवेळीच लावाव्यात. सजीव कुंपणासाठी शेवरी, बांबू, सुरू, गजराज गवत किंवा निरगुडी यांची लागवड करावी. केळी लागवडीच्या वेळेस सजीव कुंपण लावले नसल्यास बागेभोवती ज्वारी किंवा बाजरी किंवा मका कडबा यांचा झापा करून लावावे किंवा हिरवी शेडनेट बागेभोवती लावावी. 

👉 बागेतील सर्व विषाणूग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत. 

👉 बाग सतत तणमुक्त ठेवावी. बाग स्वच्छ ठेवण्यासाठी उभी आडवी कोळपणी करावी. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यापर्यंत अशी कोळपणी करता येते. 

👉 दर दोन महिन्यांच्या अंतराने टिचणी बांधणी करावी. झाडांना मातीची भर द्यावी. 

👉 मुख्य खोडालगत येणारी पिल्ले धारदार विळ्याने जमिनीलगत दर दोन ते तीन आठवड्यांनी कापावीत. 

👉 केळीची रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत. 

👉 केळफुल निसवताच २-६ टक्के सच्छिद्रता असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा पॉलीप्रोपीलीनच्या पिशव्या वापरून घड पूर्णपणे झाकावे किंवा जुन्या कांदेबागेमधील फळवाढीच्या अवस्थेतील घड हे कोरड्या केळी पानांनी झाकावे. 

👉 झाडे पडू नयेत म्हणून गरजेप्रमाणे बांबू किंवा पॉलीप्रोपीलीनच्या पट्ट्यांच्या साह्याने झाडांना आधार द्यावा. 

👉 बागेत पाणी साचलेले असेल, तर अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढावे. बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post