रब्बी हंगामात टोमॅटो लागवड नियोजन

टोमॅटो 

रब्बी हंगामात टोमॅटो लागवड ही सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पुनर्लागवड केली जाते. साधारणपणे सरळ वाणांसाठी १६० ग्रॅम व संकरित वाणांसाठी ५० ग्रॅम बियाणे प्रतिएकरसाठी पुरेसे होते. थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे चोळावे. त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. साधारणपणे १ एकर क्षेत्रावर लागवडीसाठी १.२ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते. रोपवाटिकेची जमीन उभी-आडवी चांगली नांगरून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. त्यानंतर ३ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यांमध्ये ५ किलो चांगले कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९:१९:१९ किंवा १०० ग्रॅम १५:१५:१५ आणि २०० ग्रॅम निंबोळी पेंड चांगली मिसळावी. सोबत ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम एकसारखे मिसळून घ्यावे. जेणेकरून रोपवाटिकेमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळला जाईल. गादीवाफ्यावर हाताने किंवा खुरप्याच्या साह्याने १० सें.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सें.मी. अंतरावर बी पेरावे. लगेच बी मातीने झाकून झारीने हलके पाणी द्यावे. साधारण ५ ते ८ दिवसांत बी उगवते. बी उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाटाने पाणी द्यावे. पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. रोपे उगवल्यानंतर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ कापड २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीप्रमाणे गादीवाफ्यावर लावून रोपे झाकून घ्यावीत. रोपे २५ ते ३० दिवसांत पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post