हळद
पाणी व्यवस्थापन
पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा पाहून पाणी द्यावे. पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये दोन पाण्यातील अंतर १२ ते १५ दिवस ठेवले तरी चालते. शेवटी नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीक काढण्याअगोदर १५ दिवस अजिबात पाणी देऊ नये. पाऊस समाधानकारक असेल तर हलक्या ते मध्यम प्रतीच्या पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्या लागतात. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. ठिबकचा वापर करायचा असल्यास गादी वाफा पद्धतीने लागवड करावी आणि दोन लॅटरलमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे. हलक्या माळरानाच्या जमिनीत पाण्याची उभी हालचाल जास्त होते व आडवी कमी होते, त्यामुळे दोन तोट्यामधील अंतर ३०-४० सें.मी. ठेवावे. मध्यम प्रतीच्या जमिनीत आडवी आणि उभी हालचाल सारखीच होते, त्यामुळे दोन तोट्यांमधील अंतर ५०-६० सें.मी. ठेवावे. तर भारी काळ्या खोल जमिनीमध्ये पाण्याची आडवी हालचाल जलद होते, तर उभी हालचाल कमी होत असल्यामुळे दोन तोट्यांमधील अंतर ७०-७५ सें.मी. ठेवावे. जमिनीतील ओलाव्यानुसार संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. त्यामुळे सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्याने १० ते १५ टक्के उत्पादन जास्त मिळाल्याचे दिसून आले आहे. तुषार पद्धतीचा अवलंब करताना मानवी शक्तीने हलविल्या जाणाऱ्या पोर्टेबल पद्धतीचा किंवा क्षेत्र मोठे असेल तर स्प्रिंकलर गन पद्धतीचा वापर करावा.