आंबा
आंब्याची पारंपारीक लागवड १० x १० मीटर अंतरावर केली जाते, तर सघन लागवड ५ x ५ मीटर अंतरावर चौरसाकृती पद्धतीने करण्याची शिफारस आहे. आंब्याची लागवड करताना ती शक्यतो पावसाळ्याच्या सुरवातीला पण पाऊस स्थिरावल्यावर करावी. अती पावसाच्या काळात (जुलै, ऑगस्टमध्ये) लागवड करू नये. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त कलमांमध्ये सर्वत्र पोहोचण्याच्या दृष्टीने दोन कलमांतील अंतर उत्तर-दक्षिण व दोन ओळींतील अंतर पूर्व-पश्चिम ठेवावे. लागवडीसाठी १ × १ × १ मीटर आकाराचा खड्डा खणून त्यात चांगली माती, ४ घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून खड्डा भरून घ्यावा. सघन लागवडीसाठी कोकणात हापूसची शिफारस आहे. त्याच बरोबरीने १० ते १५ टक्के रत्ना, आम्रपाली, मल्लिका, केसर या जातींची लागवड करावी. रोपवाटिकेतून अधिक उंचीची कलमे घेत असताना मुळांची पिशवीत गुंडाळी झालेली नाही याची खात्री करावी. एक वर्ष वयाची १० × १४ इंच आकाराच्या पिशवीत वाढलेली कलमे लावावीत. बागेला सुरुवातीपासून ठिबकद्वारे पाणी द्यावे. त्यासाठी बुंध्यात एक व उत्तर-दक्षिण बाजूला १ फूट अंतरावर ८ लिटर प्रति तास क्षमतेचे ड्रीपर लावावेत. आंबा लागवडीमध्ये सुरवातीच्या काळात उत्पादन मिळण्यासाठी नाचणी, वरी, तीळ, भुईमूग, भाजीपाला, कंदपिके इत्यादींची लागवड करता येते.