केळी
लागवडीसाठी ऊती संवर्धित रोपांचाही उत्तम पर्याय आहे. दर्जेदार जातींची विषाणू निर्देशांक तपासलेली निरोगी रोपे खात्रीशीर उत्पादकांकडून खरेदी करावीत. ऊती संवर्धित रोपे एकसारख्या वाढीची, ३० ते ४५ सें.मी. उंचीची व किमान ६ ते ७ पाने असलेली असावीत. ऊती संवर्धित रोपांची लागवड करावयाची असल्यास ती शक्यतो एक-दोन पाऊस पडल्यावर जमिनीत पुरेसा ओलावा असल्यावरच करावी. लागवडीपूर्वी शेतात ठिबक सिंचन यंत्रणा बसवावी. केळी लागवड योग्य पद्धतीने करावी. योग्य फुलीवर कुदळीने खड्डा घेऊन त्यात रोप लावावे. लागवडीनंतर प्रतिदिन प्रतिझाड किमान ५ लिटर पाणी द्यावे. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी रोपाभोवतालची माती पायाने दाबावी. अतिवृष्टीबरोबरच वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटतात. परिणामी प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो. तसेच वाऱ्यामुळे झाडे कोलमडूनही फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी केळी बागेभोवती दोन मीटर अंतरावर सजीव कुंपणाच्या दोन ओळी केळी लागवड करतेवेळीच लावाव्यात. सजीव कुंपणासाठी शेवरी, बांबू, सुरू, गजराज गवत किंवा निरगुडी यांची लागवड करावी.