आले
जमीन भुसभुशीत राहण्यासाठी आडवी-उभी नांगरट करून घ्यावी. दोन नांगरटींमध्ये पंधरा दिवसांचे अंतर ठेवावे. त्यानंतर मागील पिकाची धसकटे वेचून कच्चे गादीवाफे तयार करून घ्यावेत. कच्या गादीवाफ्यावर शेणखत एकरी १२ ते १५ टन, निंबोळी पेंड ४०० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो, म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो टाकून घ्यावा. त्यानंतर रोटाव्हेटर मारून खते मिसळून घ्यावीत. पक्के गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. गादीवाफ्यावर दोन ओळी लावल्या असतील, तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५० ते ६० सें.मी., तर उंची ३० सें.मी. ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेऊन, दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे. गादीवाफ्यावर तीन किंवा त्यापेक्षा जास्त ओळी लावायच्या असतील तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळीप्रमाणे दोन सरींतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि रोपांमध्ये २२.५ सें.मी. अंतर ठेवावे. आले लागवडीपूर्वी गादीवाफे पूर्णपणे भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर आल्याची लागवड करावी आणि लगेच पाणी द्यावे. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूला असावा, त्यामुळे निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढ चांगली होते. कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावेत. लागवडीच्या वेळी कंद पूर्णपणे झाकले जातील, याची दक्षता घ्यावी. एकरी ३० ते ३५,००० रोपांची संख्या किंवा कंदांची संख्या ठेवावी.