आंबा आठवडी सल्ला कोय कलम


 आंबा
कोय कलम 
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी ही साधी व सोपी पद्धत वापरून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे करता येतात. या पद्धतीत सुमारे ७०-८०% यश मिळते. यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. या पद्धतीत गादीवाफ्यावर कोयी रुजवून १५-२० दिवसांचे, पाने व देठाचा रंग तांबडा असलेले रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे. रोपाचा खालचा ७-९ सें.मी.चा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून मधोमध सुमारे ४-६ सें.मी. लांबीचा उभा काप घ्यावा. तीन ते चार महिने वयाची, जून, निरोगी आणि फुगीर डोळ्याची , १०-१५ सें.मी लांबीची काडी घ्यावी. त्या काडीवरील सर्व पाने कापून टाकावीत. काडीच्या खालून ४-६ सें.मी. लांबीचा पाचरीसारखा काप घेऊन आकार द्यावा. ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. जाड काडीसाठी एक बाजू रोपाच्या सालीस जुळवून घ्यावी. कलमाचा जोड २ सें.मी. रुंद व २० सें.मी. लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. बांधलेली कलमे १४ x २० सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड २-५ सें.मी. मातीच्यावर राहील याची काळजी घ्यावी. कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे, मात्र पाणी कलमांच्या जोडात जाणार नाही याची काळजी घ्यावी. कलमाच्या फुटीवरील पाने गर्द हिरवी झाल्यावर कलमे हळूहळू मोकळ्या जागी उघड्यावर आणावीत. कलमाच्या जोमदार वाढीसाठी आठ दिवसांपर्यंत साठविलेल्या ५०% गोमुत्राची फवारणी (२० मि.लि.) व ५०% गोमुत्राची (१०० मि.लि.) प्रति पिशवीत भिजवण महिन्यातून एकदा अशी तीन महिने करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post