आंबा
पावसाची तीव्रता कमी असताना झाडास खते द्यावीत. एक वर्षाच्या आंबा कलमास ५ किलो शेणखत, ३२५ ग्रॅम युरिया, ३१२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि २०० ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा १६६ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा प्रति कलम द्यावी. हे प्रमाण दरवर्षी समप्रमाणात वाढवत न्यावे. दहा वर्षांवरील प्रत्येक आंबा कलमांस ५० किलो चांगले कुजलेले शेणखत, ३ किलो २५० ग्रॅम युरिया, ३ किलो १२५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २ किलो सल्फेट ऑफ पोटॅश किंवा १ किलो ६६० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा प्रती कलम बांगडी पद्धतीने देण्यात यावी. खते कलमाच्या विस्ताराच्या आत सुमारे ४५ ते ६० सें.मी. रुंद आणि १५ सें.मी. खोल वर्तुळाकार चर खणून द्यावीत. या सोबतच २०० ग्रॅम अॅझेटोबॅक्टर व २०० ग्रॅम पी.एस.बी. शेणखतामध्ये मिसळून द्यावे. चरामध्ये प्रथम पालापाचोळा, शेणखत त्यावर रासायनिक खते टाकून मातीने चर बुजवून घ्यावेत. पालाश खताची मात्रा सल्फेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून दिल्यास फळांमध्ये साका येण्याचे प्रमाण कमी होते.