केळी
मृगबाग लागवड
👉 जमीन- लागवडीसाठी मध्यम ते भारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. क्षारयुक्त, चोपण व चुनखडीयुक्त जमिनीमध्ये केळीची लागवड करू नये.
👉 जाती- फुले प्राइड, ग्रॅंड नैन, श्रीमंती
👉 लागवडीचे अंतर- चौरस पद्धत १.५ x १.५ मी.
👉 बेणे निवड- केळी लागवडीसाठी मुनवे निरोगी आणि जातीवंत मातृबागेतूनच निवडावेत. शक्यतो आवश्येक बेण्यांच्या संख्येच्या दुप्पट बेणे काढावेत. अशा बेण्यातून ३ ते ४ महिने वयाचे, ४५०-७५० ग्रॅम वजनाचे, उभट किंवा नारळाच्या आकाराचे कंद लागवडीसाठी निवडावेत.
👉 बेणे प्रक्रिया- निवडलेल्या चांगल्या बेण्यावर भौतिक, रासायनिक बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.
भौतिक बेणे प्रक्रिया- बेण्यावरील माती, मुळ्या कोयत्याने काढाव्यात. बेण्यावर ३-४ रिंगा ठेवून इतर भागाची साल १ सें.मी. खोलीपर्यंत तासावी. या संस्कारामुळे सूत्रकृमीच्या प्रादुर्भावापासून बेण्याचे संरक्षण होते. तसेच खोडकिडीचा उपद्रव आढळल्यास असे बेणे वेगळे करता येते.
रासायनिक बेणे प्रक्रिया- भौतिक बेणे प्रक्रिया केलेल्या बेण्यावर रासायनिक प्रक्रिया केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या करपा, सूत्रकृमी तसेच जिवाणूजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. रासायनिक बीजप्रक्रिया करण्यासाठी १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १५० ग्रॅम अॅसिफेट प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात मिश्रण तयार करून लागवडीपूर्वी कंद त्या द्रावणात ३० ते ४० मिनिटे बुडवून मग लागवडीसाठी वापरावेत.