सोयाबीन
उगवण क्षमता तपासणी
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वाणांचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादीत होणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. उगवण क्षमता तपासणी करण्याकरिता गोणपाट किंवा वर्तमानपत्राचा कागद वापरावा. एका ओळीमध्ये १.५ ते २ सें.मी. अंतरावर १० दाणे ठेवावेत. अशा प्रकारे १० ओळींमध्ये एकूण १०० दाणे व्यवस्थित रांगेत ठेवावे. त्यानंतर गोणपाटावर अथवा वर्तमानपत्रावर पाणी टाकून ओले करावेत. ते गोल गुंडाळून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. अधूनमधून त्यावर पाणी शिंपडत राहावे. सहा ते सात दिवसांनंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. जर उगवण झालेल्या बियाण्यांची सरासरी संख्या सत्तर किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे. शिफारशीप्रमाणे ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येईल. उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या सत्तरपेक्षा कमी असेल, तर एकरी बियाण्याचे प्रमाण त्यानुसार वाढवून पेरणी करावी. मात्र, साठ टक्क्यांपेक्षा कमी उगवणशक्ती असणारे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरू नये.