भुईमुग
भुईमूग काढणीमध्ये दोन महत्वाची कामे असतात; भुईमुगाचे झाड उपटणे आणि उपटलेल्या वेलीच्या शेंगा तोडणे. भुईमूग काढणी करतेवेळी जमिनीत पुरेसा ओलावा किंवा वाफसा स्थिती असल्यास वेली शेंगासह उपटून काढणी करता येते. मात्र, जमीन कडक झाली असल्यास बैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित अवजारांचा वापर करता येतो. त्यामध्ये पास किंवा भुईमूग काढणी यंत्र उपलब्ध आहेत. शेंगा तोडण्यासाठी विविध वाणाप्रमाणे, ठिकठिकाणी विविध प्रकार अवलंबविले जातात. उपट्या वाणांमध्ये उपटलेले वेल हिरवे असतानाच शेंगा हाताने तोडून किंवा पासेवर वेल आपटून वेलीपासून वेगळ्या केल्या जातात. शेंगा वेगळ्या करण्यासाठी स्ट्रिपर्स उपलब्ध आहेत. ते मजुरांकरवी किंवा यंत्राद्वारे चालतात. पसरणाऱ्या वाणांमध्ये काढणी केलेले वेल वाळवून त्यापासून काठीने ठोकून शेंगा वेगळ्या केल्या जातात. उफणणी यंत्राने शेंगा वेगळ्या केल्या जातात.
भुईमूग काढणी करतेवेळी शेंगामध्ये ४० ते ५० टक्के ओलावा असतो. काढणी केलेल्या शेंगा वाळवून त्यातील ओलावा १० टक्क्यांपर्यंत कमी करावा. यामुळे शेंगा साठवणुकीमध्ये सुरक्षित राहतात. उन्हात शेंगा वाळविणे ही चांगली व सोपी पद्धत आहे. शेंगामध्ये बुरशी वाढू नये, म्हणून शेंगा लवकर वाळवाव्यात. मात्र उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा बियाण्यासाठी घेतल्या असतील, तर त्या उन्हात वाळवू नयेत. अन्यथा बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.