पशु संवर्धन :-
टंचाई काळात पाणी उपलब्धता नसल्याने जनावरे ओढे, नाले, तलावातील साठलेले व खराब पाणी पितात. अनेकवेळा गढूळ अस्वच्छ पाण्याचा पुरवठा गोठ्यांना होत असतो. अस्वच्छ साठलेले पाणी असल्यास त्यातून जनावरांना विविध रोगाची लागण होऊ शकते. पाणी साठविण्याचे हौद अनेक दिवस स्वच्छ केले जात नाहीत. त्यात शेवाळ वाढून त्यातून विविध रोगजंतू पसरविले जाऊ शकतात.
स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा हौद किंवा टाकी पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण कोरडी करून त्याला आतून चुना लावावा. त्यामुळे त्यात शेवाळ वाढणार नाही. तसेच पाणी थंड राहून त्यातून कॅल्शिअमचाही थोडा पुरवठा होईल. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवणे सारखा सोपा उपाय करू शकतो. बाजारात पाणी स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टॅबलेटही उपलब्ध आहेत.