हळद
जमिनीची निवड
हळद पिकाची यशस्विता प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवर अवलंबून असते. हे पीक कोकणामध्ये अगदी जांभ्या जमिनीमध्ये तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीमध्ये घेतले जाते. जमीन ही उत्तम निचरा असणारी निवडावी. कारण हे पीक जमिनीमध्ये आठ ते नऊ महिने राहते. पाण्याचा उत्तम निचरा नसल्यास हळदीस कंदकूज होण्याचा धोका वाढतो. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी. जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके (ताग, धैंचा) गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी. भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो हळद लागवडीसाठी टाळाव्यात. अगदी माळरानाच्या जमिनीत सुद्धा या पिकाची लागवड करता येते; परंतु या जमिनीमध्ये सरासरी उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने सुपीकता वाढवावी, सेंद्रिय खते व रासायनिक खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर करावा. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लागवड केल्यास पिकावर कायम पिळसर छटा राहते, कारण अन्नद्रव्यांचे ग्रहण या जमिनींमध्ये योग्यप्रकारे होत नाही. हळदीच्या पिकासाठी बेवड म्हणून कंदवर्गीय पिके जसे आले, बटाटा किंवा हळदीवर हळद घेणे शक्यतो टाळावे. हळदीसाठी द्विदल पिके जशी घेवडा, भुईमूग, हरभरा यांसारख्या पिकांचा बेवड चांगला असतो.