कांदा-लसूण
🧅 रब्बी कांदा काढणी:-
कांदा काढणीच्या १० ते १५ दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. पिकाची काढणी ५० टक्के पातींच्या माना पडल्यानंतर करावी. डेंगळे आलेले कांदे आढळल्यास त्वरित काढून टाकावेत. पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा. अन्यथा मान जास्त वाळली तर ती कांदा उपटताना तुटते; परिणामी कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो. त्यामुळे खर्च वाढतो. कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. प्रत्येक वाफ्यातील कांदा अशारीतीने ठेवावा, की दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. तीन दिवस शेतामध्ये सुकल्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब नाळ (मान) ठेवून कापावी. नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत १०-१२ दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो. कांद्याची तळाशी व बाजूने हवा खेळती राहणार्या कांदा चाळीत साठवणूक करावी.