वेल वर्गीय पिके
कलिंगड, खरबूज पिकामध्ये फळांच्या पक्वतेच्या कालावधीत फळे तडकणे या विकृतीमुळे उत्पादकांना नुकसान सहन करावे लागते. ही विकृती प्रामुख्याने जमिनीमधील असमान ओलावा व अन्नद्रव्यांचा असमतोल (अतिरिक्त नत्र आणि अपुरे पालाश, कॅल्शियम, बोरॉन), विषम वातावरण (तापमानातील चढउतार), काही संवेदनशील जाती यांमुळे दिसून येते. फळे तडकणे टाळण्यासाठी फळांच्या पक्वतेच्या कालावधीत जमिनीमध्ये एकसमान ओलावा राहील, अशाप्रकारे वातावरणानुसार पाणी व्यवस्थापन करावे. पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये, तसेच पिकाच्या गरजेपेक्षा अतिरिक्त पाणी देण्याचे टाळावे. शक्य असल्यास सेंद्रिय पदार्थांचे किंवा प्लॅस्टिक आच्छादन करावे. ठिबक सिंचनाद्वारे संतुलित प्रमाणात (विशेषतः पालाश, कॅल्शियम, बोरॉन) विद्राव्य खतांच्या मात्रा द्याव्यात. उत्कृष्ट व्यवस्थापनाद्वारे फळांच्या पक्वता कालावधीत पाने अधिकाधिक कार्यक्षम राखावीत.