आंबा
आंबा झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडी मुळे यावर दिसून येण्याची शक्यता असते. यासाठी किडीच्या प्रादुर्भावाकडे खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुस्सा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुस्सा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावेत.
प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी खोडाची प्रादुर्भाग्रस्त साल काढून तारेच्या हुकाने अळीला बाहेर काढून मारून टाकावे. क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झालेल्या ठिकाणी त्वरित बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाहीत, याची नेहमी काळजी घ्यावी. नियमित बागेची गवत काढून साफसफाई करावी. वाळलेल्या फांद्या कापलेल्या भागावर डांबर लावावे. त्यामुळे तेथून किडीचा संभाव्य प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.