आंबा
तयार आंबा फळांची काढणी देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला उन्हाची तीव्रता कमी असताना व पावसाचा अंदाज घेऊन करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढू शकते. हे टाळण्यासठी काढणी चालू असताना व काढणी झालेले आंबे लगेचच झाडाच्या सावलीमध्ये ठेवले जातील, याची काळजी घ्यावी.
काढणीपश्चात आंबा फळांचे फळकूज या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी फळांची काढणी देठासह करावी. काढणीनंतर फळे पोटॅशिअम मेटा बायसल्फाईट ०.०५ टक्के (०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या रसायनाच्या ५० अंश सेल्सिअस इतक्या उष्णजल द्रावणात १० मिनिटे बुडवावीत. त्यानंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. फळांची पॅकिंग कोरूगेटेड फायबर बोर्ड बॉक्समध्ये करावी. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी.
ढगाळ वातावरण राहून, हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने वाढीच्या अवस्थेतील आंबा फळांवर करपा रोगाच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. असा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम (१२%) + मॅंकोझेब (६३% डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.