पशु संवर्धन |उन्हाळ्यातील जनावरांची काळजी |

 पशु संवर्धन :-  

प्रखर ऊन, अधिक तापमानामुळे जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता असते. म्हशी, संकरित गाईंमध्ये उष्माघाताचे प्रमाण जास्त असते. जास्त वयस्क व कमी वयाची जनावरे उष्माघातास जास्त बळी पडतात. उष्माघातामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते, बऱ्याचदा उष्माघात प्राणघातक होऊ शकतो. उष्माघातासाठी तापमान वाढ, वातावरणातील भरपूर आर्द्रता, कोंदट गोठा, जनावरे उन्हात चरण्यास सोडणे, लांबवर वाहतूक, पिण्याच्या पाण्याची कमरता, दिवसा सावलीची सोय नसणे इत्यादी कारणे असतात. उष्माघातामध्ये शरीराचे तापमान १०३-१०७ डिग्री फॅरनहाईटपर्यंत वाढते. श्वसनाचा वेग, हृदयाचे ठोके वाढतात. जनावर जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करते. जनावर लाळ गाळते. नाकातून स्राव येतो. जनावराला भरपूर तहान लागते. जनावर अस्वस्थ होते. जनावरांना शरीराचा तोल सांभाळता येत नाही. जनावर चालताना अडखळते व कोसळते. जनावराला झटके येतात. जनावर बेशुद्ध पडून दगावते. 

उष्माघात टाळण्यासाठी जनावरांचा गोठा हवेशीर असावा. जनावरांना हवेशीर ठिकाणी बांधावे किंवा गोठ्यामध्ये पंख्याची व्यवस्था करावी, जेणेकरून हवा खेळती राहील. उन्हाच्या वेळेत जनावरे चरावयास सोडू नयेत. उन्हाच्या वेळी जनावरांची लांब वाहतूक टाळावी. जनावरांची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी करावी. जनावरांना दिवसा सावलीची सोय करावी. 

उष्माघातग्रस्त जनावराचे अंग थंड पाण्याने ओले करावे, जेणेकरून शरीराचे तापमान कमी होईल. पिण्यासाठी भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे, चघळण्यास बर्फ द्यावा. जनावराच्या डोक्यावर बर्फाने शेकावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने थंड ग्लुकोज सलाईन, तापनाशक औषधे द्यावीत. आजारी जनावरास सावलीत बांधावे, उन्हात अजिबात नेऊ नये.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post