कांदा-लसूण
कांदा बियाण्याची काढणी, मळणी
👉 कांद्याच्या फुलांचे दांडे निघण्याचा काळ हा एकसमान नसतो. त्यामुळे एका झाडात वेगवेगळ्या काळात बी परिपक्व होते. बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे बाह्य आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यातील ५ ते १० टक्के आवरणे फाटून बी दिसायला लागल्यावर बी परिपक्व झाले असे समजावे. असे गोंडे काढून घ्यावेत.
👉 एका शेतातील सर्व गोंडे एकदम तयार होत नाही. गोंडे तयार होतील तसे काढून घ्यावेत. सामान्यतः तीन ते पाचवेळा गोंड्याची काढणी हाताने करावी लागते.
👉 गोंड्यांची काढणी सकाळच्या वेळी करावी. कारण सकाळच्या वेळी वातावरणातील आद्रतेमुळे गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असतो, त्यामुळे बी गळून पडण्याची भीती नसते.
👉 गोंडे खुडून काढावेत, ओढून काढू नयेत. गोंडे काढताना मुख्य झाड उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी.
👉 गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून पाच ते सहा दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत. गोंडे सुकवताना तीन ते चारवेळा खाली वर करावेत. गोंडे चांगले न सुकल्यास बी मळणी अवघड होते. तसेच बियांवर सालपट चिकटून राहिल्याने त्यांची भौतिक शुद्धता कमी होते.
👉 चांगल्या सुकलेल्या गोंड्यामधून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. जास्त जोरात कुटल्यावर बियांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यानंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे.
👉 हलके, फुटलेले, पोचट बी चाळणीच्या किंवा प्रतवारी यंत्राच्या साहाय्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बी एकत्र करावे.