केळी
आच्छादन
उन्हाळ्यात वातावरणातील तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जमिनीतील पाण्याचा अंश झपाट्याने खालवतो. त्यामुळे उन्हाळ्यात केळी बागेला आच्छादन देणे आवश्यक असते. ३० मायक्रॉन जाड चंदेरी किंवा काळ्या रंगाच्या पॉलीइथिलीनचा आच्छादनासाठी वापर फायदेशीर दिसून आला आहे. हे आच्छादन मृगबागेमध्ये केळीच्या दोन ओळीतील मोकळ्या जागेत नोव्हेंबर महिन्यापासून टाकण्यात यावे. या आच्छादनाच्या वापरामुळे जमिनीचे तापमान थंडीत टिकून राहते, तर उन्हाळ्यात वातावरणातील तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी राहते. बाष्पीभवनाच्या वेग मंदावतो व जमिनीतील पाण्याचा अंश टिकून राहतो. जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संख्येत वाढ होते. घड सटकणे व झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण कमी होते. तणांचा बंदोबस्त होतो. पॉलिथीनच्या कापडाचे आच्छादन देणे शक्य नसल्यास बागेमध्ये केळीची वाळलेली पाने (रोगविरहित), उसाचे पाचट, गव्हाचा अथवा सोयाबीन भुसा यांचा ‘सेंद्रिय’ आच्छादन म्हणून वापर करता येतो.