टोमॅटो पिक आठवडी नियोजन

 टोमॅटो

टोमॅटो रोपांची पुनर्लागवड पॉलिमल्चिंग अंथरून केल्यास तण नियंत्रण, ओलावा व्यवस्थापन होऊन एकूण उत्पादनात वाढ होते. मल्चिंग पेपर वापरल्याने, पिकातील तणांचे प्रभावी नियंत्रण होऊन आंतर मशागतीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात बचत होते. पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊन पाण्याची उपलब्धता कमी असतानादेखील टोमॅटोचे यशस्वीपणे उत्पादन घेता येते. वातावरणाच्या संपर्काने रासायनिक खतांमधून अन्नद्रव्यांचा होणारा ऱ्हास टाळला जातो. अधिक किंवा कमी तापमान यांपासून मुळे सुरक्षित राहतात. मातीचे तापमान नियंत्रित राहिल्याने, अन्नद्रव्यांचे शोषण योग्यरीतीने होते. जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ चांगली होते. टोमॅटोच्या खालील पानांचा, फळांचा मातीशी संपर्क न आल्याने फळांची प्रत सुधारते. तसेच रोग-किडींचा प्रादुर्भावदेखील कमी राहतो. यासाठी जमिनीवर अपेक्षित अंतरावर गादीवाफे तयार करून, त्यावर प्रथम ठिबक सिंचनाच्या लॅटरल टाकून घ्याव्यात. त्यावर प्लास्टिकचे आच्छादन पसरून, दोन रोपांतील अपेक्षित अंतरावर तीन इंच व्यासाची छिद्रे पाडून घ्यावीत. या छिद्रामध्ये टोमॅटो रोपांची पुनर्लागवड करावी. टोमॅटोसाठी एक मीटर रुंदी असणारा चंदेरी रंगाचा प्लॅस्टिक पेपर निवडावा. पेपरची जाडी २५ किंवा ३० मायक्रॉन असावी. पेपर साधारणतः ४०० मीटर लांबीमध्ये उपलब्ध असतात. पाच फूट अंतरावर गादीवाफे काढल्यास अंदाजे एकरी सहा बंडल लागतात. मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी ट्रॅक्टरचलित मल्च लेयिंग मशीन उपलब्ध आहेत. या मशीनच्या वापरामुळे वेळ, मजूर व श्रमात बचत होते व मल्चिंग पेपर चांगल्याप्रकारे अंथरला जातो.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post