कोबी वर्गीय पिके
जमिनीची पूर्वमशागत करण्यासाठी जमीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने उभी- आडवी नांगरून (अंदाजे ४० सें.मी. खोल) ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत ८ ते १० टन (१६ ते २० बैलगाड्या) प्रति एकर या प्रमाणात चांगले पसरून घ्यावे. जमिनीच्या उतारानुसार लागवडीसाठी योग्य आकारमानाचे सपाट वाफे किंवा रुंद सरीवाफे (ठिबक सिंचन असल्यास) तयार करावेत. फुलकोबीच्या रोपांची पुनर्लागवड ४५ सें.मी. x ४५ सें.मी. अंतरावर, कोबीची लागवड ४५ सें.मी. x ३० सें.मी., तर नवलकोल पिकाची लागवड ३० सें.मी. x २० सें.मी. अंतरावर करावी. पुनर्लागवडीपूर्वी कार्बेंडाझिम १ ग्रॅम आणि कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे १५ मिनिटे बुडवावीत. प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. रोप लावताना शेंडा खुडला जाऊ नये किंवा शेंड्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसावी. चांगल्या जोमदार रोपाची लागवड करावी, म्हणजे चांगला गड्डा पोसला जाईल व भरपूर उत्पादन मिळेल. रोपांची पुनर्लागवड संध्याकाळच्या वेळी करावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.