भुईमुग रोग नियंत्रण | टिक्का , तांबेरा , शेडेमर (बड नेक्रॉसिस) |

 भुईमुग

रोग नियंत्रण 

⭕️ टिक्का 

पानांवर लहान वर्तुळाकार काळे ठिपके व त्याभोवती पिवळी वलये तयार होतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास काळे ठिपके खोडावरसुद्धा आढळतात. यामुळे शेंगांचा आकार व संख्या कमी होते. २५ ते ५० टक्के उत्पादनात घट होते; तसेच दाण्याची प्रत खालावते. 

रोग नियंत्रणासाठी मँकोझेब २ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

⭕️ तांबेरा 

पानांवर विटकरी रंगाच्या उथळ पुटकुळ्या आढळतात. कालांतराने विटकरी रंगाच्या बिजाणूचे काळपट रंगाच्या बिजाणूमध्ये रूपांतर होते, त्यामुळे पुटकुळ्या काळ्या दिसतात. यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पानावर पुटकुळ्या विखुरतात. रोगामुळे पाने करपून गळून पडतात. 

रोग नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

⭕️शेडेमर (बड नेक्रॉसिस) 

या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिड्यांद्वारे होतो. पिकाची रोपावस्था ते पीक परिपक्वता होणे या अवस्थेपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. या रोगामुळे झाडाची पाने लहान राहतात. झाडाची वाढ खुंटते, झाडाचे कोंब जळतात. शेवटी शेंडेमर होऊन झाड मरते. अधिक प्रादुर्भावामध्ये उत्पादनात घट होते. 

रोगट झाड दिसताच उपटून जाळून नष्ट करावे. रोगाचा प्रसार करणाऱ्या फुलकिडींच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट १ मि.लि. किंवा लॅमडा सायलोथ्रीन ०.६ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post