पशु संवर्धन:-
चाराटंचाई व जनावरांच्या आहार नियोजनात फक्त हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य व क्षार मिश्रणांचा विचार होतो; परंतु या सर्वांबरोबरच पाणीसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगला चारा पुरऊनसुद्धा तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध नसल्यास, त्याचे योग्य पचन होणार नाही. उन्हाळ्यात आधीच पाण्याची कमतरता असते आणि हिरवा चारा नसल्याने त्यातून मिळणारे पाणीसुद्धा मिळत नाही, म्हणूनच पाण्याची अधिक आवश्यकता असते. जनावरांना सुका चारा खाल्यावर, दूध दिल्यावर आणि तहान लागेल तेव्हा पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे पशुपालक दोन किंवा तीनवेळा जनावरांना पाणी पाजतात. त्यामुळे जनावराला तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध होत नाही. तसेच अनेकदा जनावरे गरज नसताना सुद्धा सवय म्हणून मालकाने पाणी ठेवल्यावर अधिक पाणी पितात. या दोन्ही गोष्टींचा परिणाम चाऱ्याच्या पचनावर होतो, त्यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. यावर उपाय म्हणजे जनावराला तहान लागेल तेव्हा स्वच्छ व थंड पाणी पिण्यास उपलब्ध असावे. मुक्तसंचार गोठा पद्धतीत जनावरे मुक्त असल्याने तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतात. याचा फायदा एक ते दीड लिटर प्रति जनावर दूध उत्पादन वाढीमध्ये झालेला पहायला मिळतो. ज्यांच्याकडे मुक्तसंचार गोठा नाही, ते पशुपालक बादलीला फ्लोट वॉल्व्ह बसवून कमी खर्चात, बांधलेल्या जनावरांनासुद्धा २४ तास पाणी उपलब्ध करून देऊ शकतात. अन्यथा सकाळी व संध्याकाळी चारा खाऊन झाल्यावर गव्हाणी स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेऊनसुद्धा जनावरांना तहान लागेल, तेव्हा पाणी पिण्यास उपलब्ध करून देता येईल.