आले
आल्यामध्ये कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव पिथियम, फायटोप्थोरा, फ्युजॅरिअम, रायझोक्टोनिया या रोगकारक बुरशींच्या प्रादुर्भावामुळे होतो. कंदकुजीची प्रथम लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटव्यावर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो मऊ पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडत असते. उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होते.
कंदकूज व्यवस्थापनासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा २ ते २.५ किलो प्रति एकर २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून जमिनीमध्ये द्यावे. याचा वापर प्रतिबंधात्मक म्हणूनच करावा. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास मेटॅलॅक्सिल + मॅंकोझेब संयुक्त बुरशीनाशक (७२ डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. सडलेल्या कंदामध्ये पांढरी अळी दिसत असल्यास वरील बुरशीनाशकांसोबत क्लोरपायरीफॉस (५० इसी) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळावे. आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.