हळद
वाढीच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये कंदकूज लागण्याचा धोका असतो. हळद पिकाची पूर्ण वाढ झाल्यामुळे शेतात प्रवेश करता येत नाही. यामुळे कंदकूज रोगाची सुरुवात झालेली लवकर लक्षात येत नाही. कंदकूज सुरु झाल्याचे
ओळखण्यासाठी पिकाचे निरीक्षण करावे. कंदकूज सुरु झाल्यानंतर पिकाच्या सुरळीतील पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून १ ते १.५ सें.मी. खालीपर्यंत वाळत जातात. पुढे संपूर्ण सुरळी कोमेजून जाते. सुरळी ओढली असता ती उपसून येते व खालील भाग हा सडलेला असतो. कंदही काळा व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेला घाण वास येणारे पाणी बाहेर येते.कंदकूज व्यवस्थापनासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा २ ते २.५ किलो प्रति एकर २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून जमिनीमध्ये द्यावे. याचा वापर प्रतिबंधात्मक म्हणूनच करावा. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास मेटॅलॅक्सिल + मॅंकोझेब संयुक्त बुरशीनाशक (७२ डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. सडलेल्या कंदामध्ये पांढरी अळी दिसत असल्यास वरील बुरशीनाशकांसोबत क्लोरपायरीफॉस (५० इसी) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळावे. आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.