पूर्वहंगामी ऊस आठवडी सल्ला

 पूर्वहंगामी ऊस

ऊस लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे, उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेतल्यास एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते. उसासाठी बियाणे, खते आणि आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून मिळतो. तणांचे प्रमाण कमी होते. आंतरपीक म्हणून पिकांची निवड करताना हंगामानुसार ते पीक उसाशी स्पर्धा न करणारे, कमी उंचीचे, थोडा कमी सूर्यप्रकाश व सावली मानवणारे, मुळाची ठेवण उसापेक्षा वेगळी असणारे, अल्पमुदतीत तयार होणारे असावे. आंतरपिकाची वाढ व उंची, अन्नद्रव्ये शोषण करण्याची क्षमता, स्थानिक बाजारपेठेतील मागणी आणि जमिनीचा प्रकार इत्यादी बाबींचा विचार करावा. लागण पट्टा पद्धतीने (२.५-५ किंवा ३-६ फूट) असल्यास आंतरपीक चांगल्याप्रकारे घेता येते. पूर्वहंगामी ऊस पिकामध्ये रब्बी हंगामातील बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो, हरभऱ्यासारखी आंतरपिके घेता येतात. पूर्वहंगामी उसात बटाटा किंवा कांदा ही आंतरपिके फायदेशीर आढळली आहेत. पारंपारिक (सरी-वरंबा) पद्धतीमध्ये जमिनीच्या मगदुरानुसार ४ ते ५ फूट अंतरावर सरी-वरंबे पाडून उसाची लागवड सरीमध्ये करावी. लागवड केल्यानंतर आंबवणी देण्याच्या अगोदर वरंब्याच्या दोन्ही बगलेत आंतरपिकाची टोकण पद्धतीने लागवड करावी. कांदा, पानकोबी, फुलकोबीची रोपे लावावीत. हरभऱ्याचे वरंब्यावर टोकण करावे. पट्टा पद्धतीत साधारणपणे २.५ किंवा ३ फूट अंतरावर सऱ्या पाडून प्रत्येक दोन सऱ्यांत उसाची लागवड करावी. तिसरी सरी मोकळी सोडावी. जोडओळ लागवड करून राहिलेल्या ५ किंवा ६ फूट पट्ट्यात आंतरपिकाची लागवड करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post