गहू
गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते. जिरायत गहू मात्र ओलावा टिकवून धरणाऱ्या जमिनीतच घ्यावा. गहू पिकाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते. पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. फुटवे फुटण्याच्या वेळी थंडी पडल्यास फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते. दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस तापमान असल्यास ओंबीची लांबी, दाण्यांची संख्या आणि दाण्यांचा आकार वाढण्यास मदत होते. पूर्वमशागतीसाठी खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची १५ ते २० सें.मी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी एकरी १० ते १२ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे. पूर्वीच्या पिकांची धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे. सोयाबीन पिकाच्या बेवडावर गव्हाच्या पिकाचे उत्पादन अधिक येत असल्याचे सिद्ध झाले आहे. या पिकानंतर फणपाळी किंवा रोटाव्हेटर वापरून रान तयार करून घ्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.