भात
पावसाची उघडझाप आणि तापमानात वाढ संभवते. अशा वेळी वरकस जमिनीवर असलेल्या हळव्या जातीच्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे तयार झालेल्या हळव्या भात पिकाची त्वरित कापणी करावी. तसेच भात कापणीनंतर जमिनीची खोल नांगरणी करावी. किडीचे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होण्यास मदत होईल. लष्करी अळीचा प्रादुर्भाव निमगरव्या आणि गरव्या भात जातींवरही दिसून येण्याची शक्यता असल्याने पिकाचे किडीच्या प्रादुर्भावाकरिता सातत्याने निरीक्षण करावे. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अंडीपुंज आणि अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. निमगरव्या आणि गरव्या भात जातींवर प्रादुर्भाव दिसून येत असल्यास क्लोरपायरीफॉस (१.५ डीपी) २०० ग्रॅम प्रतिगुंठा याप्रमाणे सकाळी लवकर किंवा सायंकाळी वारा शांत असताना धुरळणी करावी.
पावसाची उघडझाप तसेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने पाणथळ भागातील गरव्या भात जातींच्या पाणी साचून राहणाऱ्या, घन लागवड आणि नत्र खताची अवाजवी मात्रा दिलेल्या खाचरात तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तपकिरी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावावर सातत्याने लक्ष ठेवावे. रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.२५ मि.लि. किंवा फिप्रोनिल (५ एससी) २ मि.लि. किंवा फ्लोनिकामिड (५० डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे चुडाच्या बुंध्यावर पडेल, अशा प्रकारे फवारणी करावी. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता नवीन पाणी घेत रहावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.