केळी
कांदेबाग हंगामात केळीची लागवड ऑक्टोबर महिन्यात केली जाते. तापमानाबरोबर घड व्यवस्थित पोसण्यासाठी अधिक आर्द्रतेची गरज असते. कांदेबाग लागवडीचे वैशिष्ट्ये म्हणजे, पिकाची वाढ सावकाश होते. कारण लागवडीच्या सुरुवातीस तापमान अधिक असते, तसेच आर्द्रता कमी असते. वाढ जरी सावकाश होत असली तरी ती पूर्ण होते. जून (मृगबाग) लागवडीची केळी झपाट्याने वाढते; मात्र त्याचा दर्जा थोडा कमी असतो. जून लागवडीच्या केळीपेक्षा ऑक्टोबर लावणीची केळी अधिक काळ टिकते. हवामान बदलामुळे मागील अनेक वर्षापासून एप्रिल, मे आणि जून महिन्यात गारपीट तसेच वादळी वारे वाहण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मृगबागेची घड पक्वता तसेच घड कापणीस आलेली केळीची झाडे उन्मळून पडतात, खोडे मोडली जातात. शेतकर्यांना ८० ते १०० टक्के नुकसान सोसावे लागते. अशा परिस्थितीत कांदेबाग लागवड हा उत्तम पर्याय आहे. कांदेबाग लागवड ही बीगर हंगामात येत असल्यामुळे मजूर स्वस्त मिळतात. मृगबागेखाली ७५ टक्के लागवड असल्याने बाजारपेठेत केळीची आवक मुबलक असल्यामुळे, केळीला बाजारभाव चांगले मिळत नाहीत. तर कांदेबागेची केळी बिगर हंगामी असल्याने सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये केळी आणून अधिक आर्थिक फायदा घेता येतो.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.