हरभरा पेरणी सल्ला

  हरभरा

हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असल्याने कोरडे व थंड हवामान त्याला मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये २५ सप्टेंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय हा वाण वापरावा. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरावा. त्याकरिता विशाल, दिग्विजय, फुले विक्रम या वाणाचे बीज उपलब्ध करून ठेवावे.
हरभर्‍याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे लागते, म्हणजे एकरी रोपांची संख्या अपेक्षित मिळते. विजय, फुले विक्रम या मध्यम दाण्यांच्या वाणाकरीता २६ ते २८ किलो; तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोर्‍या दाण्यांच्या वाणाकरिता ४० किलो प्रति एकर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पीकेव्ही ४ या जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरीता ५० ते ५२ किलो प्रति एकर बियाणे वापरावे. बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा व्हीरीडी ५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम चोळावे. यानंतर २५० ग्रॅम रायझोबिअम प्रति दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणात मिसळून चोळावे. यामुळे हरभऱ्याच्या मुळांवरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post