गहू
गव्हाच्या विशिष्ट वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य आहे. जिरायती जमिनीत गव्हाचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरतो. गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. गव्हाच्या मुळ्या ०.६ ते १ मीटर खोलीपर्यंत वाढतात. त्यामुळे योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असावी. मशागत करताना शेवटच्या कुळवणीपूर्वी एकरी १.५ ते २ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. जिरायती लागवड ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. लागवडीसाठी नेत्रावती (एनआयएडब्ल्यू १४१५), पंचवटी (एनआयडीडब्ल्यू १५) या जाती निवडाव्यात. प्रति एकरी ३० ते ४० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम याप्रमाणात प्रक्रिया करावी.
जिरायत पेरणीसाठी दोन ओळींत २२.५ सें.मी. अंतर ठेवून दोन चाड्याच्या पाभरीच्या सहाय्याने रासायनिक खतांसह पेरणी करावी. पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी दक्षिणोत्तर करावी. गव्हाची पेरणी उभी-आडवी न करता एकेरी करावी, म्हणजे आंतरमशागत करणे सोपे जाते. जिरायत पिकास पेरणीच्या वेळी १६ किलो नत्र आणि ८ किलो स्फुरद प्रति एकरी द्यावे. गव्हात जरुरीप्रमाणे एक किंवा दोनवेळा खुरपणी करावी. कोळपणी करून रोपांना मातीची भर द्यावी. आंतरमशागतीमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.