सोयाबीन
शेतकऱ्यांना बीजोत्पादन घ्यायचे असल्यास किंवा यावर्षीच्या सोयाबीनचा वापर पुढील वर्षी बियाणे म्हणून करायचा असल्यास, सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता बीज प्रयोगशाळेत किंवा घरच्या घरी तपासावी. उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास सोयाबीन बियाणे वाळवून, त्याला कार्बोक्सीन (३७.५%) + थायरम (३७.५% डीएस) ३ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे संयुक्त बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. नवीन पोत्यात हवेशीर संरक्षित कोठारात साठवावे. बुरशीनाशक लावलेल्या बियाण्याची धान्य म्हणून विक्री करू नये. साठवणूक करताना दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. बियाणे साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे. ज्यामुळे बियाण्याला ओल लागणार नाही, बियाणे खराब होणार नाही. बियाण्याची साठवणूक करताना, जास्तीत जास्त ५ पोत्याची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त उंच थप्पी लावल्यास तळाच्या पोत्यातील बियाण्याची डाळ होऊन उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. बियाणे पोत्यात साठवताना चारही बाजूने हवा खेळती राहील, अशारितीने ठेवावे. अन्यथा गोदामाच्या आत गरम जागा (हॉट स्पॉट) तयार होईल, ज्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती खूप लवकर कमी होते. बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा, मात्र त्यासाठी कूलरचा वापर करू नये. अन्यथा बियाण्याची आर्द्रता वाढेल, ज्यामुळे बियाणे खराब होऊ शकते. आवश्यकतेनुसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास कीडनाशकांची फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.