पूर्वहंगामी ऊस
पूर्वहंगामी उसाचा कालावधी १५ महिने व त्यानंतर एक किंवा त्यापेक्षा जास्त खोडवे घेतले जात असल्यामुळे उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. अशा जमिनीची खोली २ फुटांपेक्षा अधिक असावी. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान ०.५ टक्के असावे. पूर्वहंगामी ऊस घेण्यापूर्वी जमिनीमध्ये तागाचे किंवा धैंचाचे पीक घ्यावे आणि सप्टेंबर महिन्यात जमिनीमध्ये गाडावे. त्यानंतर रोटावेटरने जमिनीची मशागत करावी. भारी जमिनीतील २ फूट खोलीवरील जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर तीन वर्षातून एकदा सब सॉइलरचा वापर करावा. मातीची तपासणी करून त्याप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापनाची दिशा ठरवावी. शेवटच्या पाळीअगोदर एकरी १० टन (१६ ते २० बैलगाड्या) चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत १२०-१५० सें.मी. व मध्यम जमिनीत १००-१२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटांच्या व भारी जमिनीसाठी ३ फुटांच्या सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सऱ्यांमध्ये ऊस लागवड करून एक सरी रिकामी सोडून पुन्हा दोन ओळी ऊस लागवड करावी. रिकाम्या ओळीत आंतरपीक घ्यावे. पाण्याची कमतरता असल्याने ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. मशगतीवरील खर्च कमी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीनेच उसाची मशागत करावी. त्यासाठी दोन सरीतील अंतर १५० सें.मी. (पाच फुटांपर्यंत) ठेवावे. आंतरमशागतीसाठी लहान ट्रॅक्टरचा वापर करावा.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.