वेल वर्गीय पिके
झुकिनी पिकाची उष्ण व समशितोष्ण हवामानात लागवड यशस्वीपणे करता येते. सूर्यप्रकाश, कमी आर्द्रता (४०-४५ टक्के) आणि रात्रीचे तापमान १८ अंश सेल्सिअस तर दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअस अशा हवामानात झुकिनीचे उत्पादन व फळांची प्रत चांगली मिळते. हरितगृहात वर्षभर लागवड करण्यासाठी तापमान १० ते ३० अंश सेल्सिअस आणि सापेक्षा आर्द्रता ४० ते ४५ टक्के नियंत्रित असावी. पंचतारांकित हॉटेल्समध्ये दर्जेदार झुकिनी फळांना मागणी वर्षभर असल्याने हरितगृहात लागवड किफायतशीर ठरते. या पिकाचा कालावधी फारच कमी असतो. तो जातीपरत्वे हंगामाप्रमाणे बदलतो. सर्वसाधारण कालावधी थंड हवामानात १० ते १५ दिवसांनी लांबतो. लागवड वर्षभर करता येत असली, तरी पावसाळ्यातील (जून-जुलै) लागवड उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर ठरते. हिवाळ्यात लागवड केल्यास वाढीचा कालावधी लांबल्यामुळे उत्पादन नेहमीपेक्षा १०-१५ दिवसांनी पुढे जाते. उन्हाळ्यातील लागवड हिवाळी हंगामापेक्षा नक्कीच किफायतशीर ठरते. मात्र, पाण्याचा ताण पिकास मानवत नाही. हरितगृहातील नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेमध्ये लागवड केल्यास वर्षभर लागवड करणे शक्य होऊन फळांची प्रत व उत्पादनामध्ये वाढ होते. खुल्या शेतीसाठी हंगामाप्रमाणे (हिवाळी, पावसाळी व उन्हाळी) जातींची निवड करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.