कोबी वर्गीय पिके
ब्रोकोली पिकास कोरडे व थंड हवामान मानवते. रेताड, मध्यम, काळी, निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते. अती हलकी, क्षारयुक्त, चोपण, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. शेवटच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत पसरून जमिनीच्या उतारानुसार लागवडीसाठी सपाट वाफे तयार करावेत. लागवडीसाठी गणेश ब्रोकोली या जातीची निवड करावी. या जातीचा गड्डा आकर्षक, हिरव्या रंगाचा असून, सरासरी वजन १८० ते २०० ग्रॅम असते. गणेश ब्रोकोली जातीचा कालावधी ७० दिवसांचा आहे. या जातीचे प्रतिएकरी ६५ ते ७० क्विंटल उत्पादन मिळते. लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. लागवड करताना रोपांची मुळे ॲझोटोबॅक्टर जीवाणूसंवर्धकाच्या द्रावणात बुडवून लावावीत. रोपांची लागवड सरी-वरंबा किंवा सपाट वाफ्यात करताना दोन ओळींमध्ये ६० सें.मी. आणि दोन रोपांत ४५ सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीनंतर लगेचच हलके पाणी द्यावे. लागवडीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करून झाडांना मातीचा आधार द्यावा. ब्रोकोली पिकाला प्रतिएकरी २६ किलो नत्र, ८ किलो स्फुरद, १२ किलो पालाश पुनर्लागवडीवेळी द्यावे. पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी २६ किलो नत्र प्रतिएकरी द्यावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.