टोमॅटो रोप संरक्षण सल्ला

 टोमॅटो

टोमॅटो रोप उगवून येईपर्यंत सकाळ-संध्याकाळ झारीने पाणी द्यावे. रोप उगवल्यानंतर पाटाने गादीवाफ्याच्या चोहोबाजूने पाणी सोडावे. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी भरू नये, नाहीतर जास्त पाण्यामुळे रोपे कोलमडून मरतात. रोपे उगवून दोन पानांवर आल्यानंतर शिफारशीनुसार कीडनाशकांचा रोपवाटिकेत वापर करताना ते मुळाशेजारी उतरून मुरेल असे पाहावे, त्यामुळे रोग व किडीचे चांगले नियंत्रण ड्रेचिंगमुळे होऊन रोपांचे संरक्षण होते. रोपवाटिका ६० ते १०० मेश नायलॉन नेट किंवा पांढर्‍या पातळ मलमल कापडाने आच्छादून घ्यावी. त्यासाठी फारशा नेटची आवश्यकता नाही. साधारणतः अडीच फूट उंचीच्या काठ्या रोपवाटिकेतील गादीवाफ्याच्या बाजूने उभ्या करून त्यावर व चोहोबाजूने सभोवती नायलॉन नेट लावावी. त्यामुळे विषाणूजन्य रोग पसरविणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी उदा. फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, लाल कोळी, तसेच अन्य किडींपैकी नागअळी आदींचा रोपवाटिकेत शिरकाव होणार नाही. त्यामुळे पुढे विषाणूजन्य रोगही आटोक्यात येण्यास मदत होईल, रोपवाटिकेतील पीक संरक्षणासाठी नंतर फारशी काळजी करावी लागणार नाही. कारण रोपवाटिकेच्या जमीन निर्जंतुकीकरणानंतर जर चुकून काही सूक्ष्मजीव राहिलेले असतील, तर बीजप्रक्रिया व ड्रेचिंग आणि नायलॉन नेटचे आच्छादन केल्यामुळे त्यांचाही बंदोबस्त होऊन नवीन किडींना रोपवाटिकेत येण्यास अटकाव होईल. फक्त हवामानात काही बदल झाले, तरच फवारणीची आवश्यकता भासेल, अन्यथा पुढील २१ दिवसांपर्यंत फवारणी घेतली नाही तरी चालते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post