हळद
लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. या कालावधीमध्ये हळदीस फुटवे व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्डयामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्डयांना लावावी. माती लावताना संपूर्ण कंद झाकावा. भरणी केल्यानंतर जर पाऊस नसेल तर पिकास हलकेसे पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती निघून पावसाने वाहून जाणार नाही. भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ होते. भरणी न केल्यामुळे सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते. गादीवाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या सहाय्याने किंवा दोन गादीवाफ्यामधील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. यामुळे मजुरांच्या खर्चात बचत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
आले
आल्यामध्ये भरणी करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. लागवडीपासून २.५ ते ३ महिन्यांनी भरणी करावी. या कालावधीत आले प्रामुख्याने शाकिय वाढीच्या अवस्थेमध्ये असते, ही अवस्था आल्याच्या उत्पादनात महत्त्वाची आहे. या अवस्थेमध्ये प्रामुख्याने आल्याच्या पानांची संख्या, फुटव्यांची संख्या आणि उंची निश्चित होते. भरणी केल्याने उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते. भरणी केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि गड्ड्यांचे चांगले पोषण होते. उघडे पडलेले गड्डे पूर्ण झाकले जातात. आल्याचे गड्डे सूर्यप्रकाशात उघडे राहिल्यास ते हिरवे पडतात, त्यांची वाढ पूर्ण थांबते, त्यामुळे उत्पादनात घट येते. कंदमाशीचे नियंत्रण करता येते. भरणीवेळी दिलेली खतमात्रा मातीआड होण्यास मदत होते. त्यामुळे खते वाया न जाता त्यांची कार्यक्षमता वाढते. पावसामुळे उथळ झालेल्या सऱ्या खोल होण्यास मदत होते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करता येते. लागवड पद्धतीनुसार भरणी करण्याची पद्धत अवलंबून आहे. सरी-वरंब्यावर लागवड केलेल्या आल्यामध्ये सरीमधील ५-७ सें.मी. माती शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावावी. माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल याची काळजी घ्यावी. गादीवाफ्यावर लागवड केली असल्यास दोन गादीवाफ्यामधील सरीतील माती उकरून गादीवाफ्यावर २-३ इंचाचा थर येईल याप्रमाणे माती लावावी किंवा पॉवर टीलरच्या सहाय्यानेदेखील भरणी करता येते, त्यामुळे मजुरांची बचत होते. भरणी केल्यानंतर पाऊस नसल्यास पिकास हलके पाणी द्यावे. गादीवाफ्यावर भरणी करताना ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि तोट्या मातीमध्ये जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.