सुरु ऊस
पिकाची पाण्याची गरज ही वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, हंगाम यावर अवलंबून असते. जास्त पाणी दिल्यास जमीन क्षारपड होण्याची शक्यता असते. वाढीच्या सुरवातीच्या काळात पाण्याची गरज कमी असते. मात्र बांधणीनंतर जास्त पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे वाढीच्या अवस्थेत उन्हाळ्यात (मार्च-जून) ८-१० दिवसांनी, पावसाळ्यात (जुलै-ऑक्टोबर) १५-२० दिवसांनी, तर हिवाळ्यात (नोव्हेंबर-फेब्रुवारी) १८-२० दिवसांनी पाणी द्यावे. उगवण व फुटवा फुटण्याच्या काळात साधारणपणे ८-१० सें.मी. (वरंब्यांच्या अर्ध्या उंचीपर्यंत) पाणी द्यावे. बांधणीनंतर जोमदार वाढीच्या काळात १०-१२ सें.मी. (वरंब्याच्या २/३ उंचीपर्यंत) व पक्वता कालावधीमध्ये ७-८ सें.मी. पाणी एका पाळीस द्यावे.
खोडवा ऊस
पाणी व्यवस्थापन ऊस तुटून गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत खताची पहिली खतमात्रा दिल्यानंतर पहिले हलके पाणी द्यावे. त्यामुळे उसाची चांगली फूट होते. पाणी देण्याची पद्धत आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. पट्टा पद्धतीमध्ये जोड ओळीमधील सरीला पाणी द्यावे. खोडवा पिकामध्ये नेहमीच्या पद्धतीने २६ ते २८ पाण्याच्या पाळ्या लागतात. परंतु संवर्धित खोडवा व्यवस्थापन कार्यपद्धतीमध्ये पाचटाचे आच्छादन केल्यास १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या दिल्यास खोडव्याचे चांगले उत्पादन मिळते. खोडवा उसाचा पाचट आच्छादन केल्यास दोन पाण्याच्या पाळीतील अंतर दीडपटीने वाढवावे.ठिबक सिंचन पद्धतीचा वापर – लांब रुंद सरी किंवा जोडओळ लागवड पद्धतीच्या खोडवा पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करावा. मुळांच्या कक्षेत पाणी, हवा यांचे प्रमाण साधून पीक वाढीच्या अवस्थेनुसार खत व पाणी व्यवस्थापन केल्याने उत्पादनात वाढ होते. पाण्यात विरघळणारी खते (युरिया, फॉस्फोरिक अॅसिड आणि पांढरा पोटॅश) मुळांच्या सहवासात दिल्याने खतांच्या मात्रेत ३० ते ४० टक्के बचत होते. खोडवा पिकात वाफसा राखल्याने गांडूळे आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. पाचट लवकर कुजून जमिनीची जैविक, रासायनिक व भौतिक उपयुक्तता वाढते. खोडवा पिकामध्ये पाचट आच्छादन, ठिबक सिंचनाच्या वापरामुळे ४५ ते ५० टक्के पाण्याची बचत होते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व खताचा काटेकोर वापर करून खोडवा पिकाचे लागवडीच्या उसाइतके किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन घेणे शक्य आहे.