भुईमुग
रोग नियंत्रण
- टिक्का - पानांवर लहान वर्तुळाकार काळे ठिपके व त्याभोवती पिवळी वलये तयार होतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास काळे ठिपके खोडावरसुद्धा आढळतात. यामुळे शेंगांचा आकार व संख्या कमी होते. २५ ते ५० टक्के उत्पादनात घट होते; तसेच दाण्याची प्रत खालावते.
- रोग नियंत्रणासाठी मँकोझेब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल (२५० इसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- तांबेरा - पानांवर विटकरी रंगाच्या उथळ पुटकुळ्या आढळतात. कालांतराने विटकरी रंगाच्या बिजाणूचे काळपट रंगाच्या बिजाणूमध्ये रूपांतर होते. त्यामुळे पुटकुळ्या काळ्या दिसतात. यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पानावर पुटकुळ्या विखुरतात. रोगामुळे पाने करपून गळून पडतात.
- रोग नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- शेंडेमर (बड नेक्रॉसिस) - या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडींमार्फत होतो. पिकाची रोपावस्था ते पीक परिपक्वता या अवस्थेपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. या रोगामुळे झाडाची पाने लहान राहतात. झाडाची वाढ खुंटते, झाडाचे कोंब जळतात. शेवटी शेंडेमर होऊन झाड मरते. अधिक प्रादुर्भावामध्ये उत्पादनात घट होते.
- रोगट झाड दिसताच उपटून जाळून नष्ट करावे. रोगप्रसार करणाऱ्या फुलकिडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० ईसी) १ मि.लि. किंवा लॅमडा सायलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
कृषिक अप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.