पूर्वहंगामी ऊस
पक्क्या भरणीयोग्य १६ ते २० आठवडे वयाच्या उसात आंतरपिके घेतली असल्यास त्यांची काढणी करावी. काढणीनंतर पहारीच्या साह्याने सरीचे वरंबे फोडून उर्वरित रासायनिक खतांची मात्रा प्रति एकरी ५५ किलो नत्र (११९ किलो युरिया), ३४ किलो स्फुरद (२१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ३४ किलो पालाश (५६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) या प्रमाणात द्यावी. खतमात्रा एकत्र चांगली मिसळून सऱ्यांच्या संख्येत विभागून द्यावी. खते दिल्यानंतर रिजरने भरणी करावी व रानबांधणी करून लगेच पाणी द्यावे. को-८६०३२ ही जात अधिक उत्पादनक्षम असल्याने रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. यासाठी खतमात्रा एकरी २५ टक्के जादा द्यावी.
सुरु ऊस
ऊस लागवडीस दोन महिने झाले असल्यास, मल्टि मॅक्रोन्यूट्रीयंट (नत्र ८ टक्के, स्फुरद ८ टक्के व पालाश ८ टक्के) व मल्टि मायक्रोन्यूट्रीयंट (ग्रेड - २ : लोह २.५ टक्के, मँगेनीज १ टक्के, जस्त ३ टक्के, मॉलीब्डेनम ०.१ टक्के, बोरॉन ०.५ टक्के) द्रवरूप खत २ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. तसेच तीन महिने झाले असल्यास, प्रत्येकी ३ लिटर प्रति ३०० लिटर पाण्यातून एकरी फवारणी करावी