केळी
सूत्रकृमी
केळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त प्रमाणात आढळतात. सूत्रकृमी हे अतिसूक्ष्म (०.२-०.५ मि.मी. लांब) लांबट धाग्यासारखे, पारदर्शक व रंगहीन असतात. केळीच्या कंदामध्ये सूत्रकृमीची मादी दररोज ४-६ अंडी घालते, त्यातून छोटे कृमी बाहेर पडतात. हे सूत्रकृमी मुळांच्या टोकांकडून आत घुसून नुकसान करतात. मुळांवर चट्टे किंवा जखमा करणारे सूत्रकृमी (प्राटायलेनचस कॉफी, रेडॉफिलस सिमीलिस, हेलिकोटायलेनचस मल्टीसिन्कटस) मुळांच्या पेशीमधून अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे मुळांच्या अक्षाभोवती समांतर रेषेत तपकिरी लाल ते काळ्या रंगाचे लंबाकार डाग तयार होतात. मुळांमधील पेशी मरतात. त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होऊन झाडाचा जोम कमी होतो, ते मलूल होते. फळधारणा कमी होते. मुळांअभावी झाडाचे खोड जमिनीवर कोसळते. मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी (मेलायडोगायनी इनकॉग्नीटा, मेलायडोगायनी जावानिका) मुळातील अन्नरसावर जगतात. मुळे काळी पडून कुजतात. मुळांवर गाठी तयार होऊन वाढ खुंटते.
🛡 उपाययोजना
👉 जमिनीची खोल नांगरट करून दोन-तीन महिने उन्हामध्ये तापू द्यावी.
👉 पीक फेरपालट करावी. लागवडीपूर्वी जमिनीमध्ये हिरवळीची पिके घ्यावीत.
👉 लागवडीपूर्वी कंद चांगल्याप्रकारे तासून नंतर निंबोळीवर आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्टिन (१५०० पीपीएम) २० मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून ३० मिनिटे कंदप्रक्रिया करावी.
👉 पाण्याचा योग्य निचरा करावा. बाग नेहमी स्वच्छ ठेवावी.
👉 बागेमध्ये झेंडूचे आंतरपीक घेतल्यास सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी होतो.
👉 लागवडीवेळी आणि त्यानंतर तिसऱ्या व सहाव्या महिन्यात, सुडोमोनास फ्लोरोसन्स २० ग्रॅम अधिक निंबोळी पावडर २५० ग्रॅम प्रतिझाड खोडाभोवती बांगडी पद्धतीने द्यावे.
👉 प्रादुर्भाव जास्त असल्यास खोडवा घेणे टाळावे.
-------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.