आंबा पालवी व मोहोरावरील प्रमुख रोग

 आंबा

पालवी व मोहोरावरील प्रमुख रोग

⭕️ भुरी बुरशीची बीजे कोवळया पालवीवर किंवा मोहोरावर रूजून येताच त्यांचा मुळांसारखा भाग पेशीमध्ये शिरुन पेशीतील अन्नरस शोषून घेतो. अशा बुरशीवर असंख्य बीजे तयार होऊन कालांतराने त्यांचा वार्‍यामार्फत पुढील प्रसार होतो. रोग कोवळया पालवीवर आल्यास पाने तांबुस रंगाची होऊन कालांतराने वाळतात, गळून पडतात. मोहोरावर रोगाची पहिली लागण त्याच्या शेंडयाजवळ होऊन नंतर तो सर्वत्र पसरतो. बुरशीच्या वाढीमुळे पेशीतील अन्नरस शोषला जाऊन मोहोराच्या वाढीवर दु:ष्परिणाम होतो. रोगाची लागण मोहोर येताच मोठया प्रमाणात झाल्यास, फळधारणा होण्यापूर्वीच फुले गळून पडतात. फळधारणेनंतर रोग उद्भल्यास फळांचे देठ सुकून त्यांची गळ होते.

🛡️ व्यवस्थापन 
👉फवारणी (प्रतिलिटर पाणी) हेक्‍झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम
⭕️करपा (ॲन्थ्रॅक्नोज) रोगाचा प्रादुर्भाव कोवळी व जुनी पाने, मोहोर, फांद्या आणि फळे यांवर होतो. कोवळ्या पानांवर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट, पिवळसर कडा असलेले डाग पडून वाढ खुंटते. पानावर चट्टे पडतात, पाने करपल्यासारखी दिसतात. मोहरावर बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास तांबूस डाग पडून मोहोर वाळतो, फळधारणा होण्यापूर्वीच फुले गळतात. फळधारणा झाल्यानंतर प्रादुर्भाव झाल्यास, लहान फळांवर काळे खोलगट डाग पडून ती गळतात. मोठी कच्ची किंवा पक्व फळेसुध्दा रोगाला बळी पडतात..

🛡️व्यवस्थापन 
👉बागेची स्वच्छता करावी.
👉१% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
👉फवारणी (प्रतिलिटर पाणी) कार्बेन्डाझिम (१२%) + मॅन्कोझेब (६३% डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post