वेल वर्गीय पिके |कलिंगड लागवड सल्ला|

 वेल वर्गीय पिके

🍉कलिंगड लागवड मध्यम काळी, पाण्याचा निचरा होणारी, उदासीन सामूची जमीन निवडावी. क्षारयुक्त, चोपण, चुनखडीयुक्त जमीन कलिंगड लागवडीस अयोग्य असते. साधारणपणे नदीकाठची पोयटा रेतीमिश्रित जमीन या पिकास योग्य ठरते. उन्हाळ्यात कलिंगडास चांगली मागणी असते. त्यामुळे साधारणतः थंडी कमी झाल्यावर लागवड योग्य ठरते. कलिंगड पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. फळांची वाढ आणि विकासाच्या कालावधीत गराची गोडी वाढण्यासाठी उष्ण दिवस व थंड रात्र योग्य ठरते. लागवडीसाठी शुगर बेबी, अर्का श्‍यामा, अर्का ज्योती, अर्का माणिक या सुधारित जाती निवडाव्यात. तर खाजगी कंपनीच्या शुगर क्वीन, सुपर क्वीन, मॅक्स, मेलडी, बाहुबली, ऑगस्टा इत्यादी जाती प्रचलित आहेत. पूर्वी कलिंगड लागवड थेट बी टोकून केली जात असे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे प्लास्टिक ट्रेमध्ये रोपे तयार करून पुनर्लागवड केल्यास वेलीचे योग्य पोषण, मजूर, पाणी, इतर निविष्ठांवर होणारा खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होते. यासाठी ९८ कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट लागते. एकरी ३५०-४०० ग्रॅम बियाणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये बोटांनी छोटा खड्डा करून एका कप्प्यात एक बी पेरून कोकोपीटने झाकावे व पाणी द्यावे. सुमारे ८-१० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकावेत. रोपे उगवून आल्यावर ३-४ दिवसांत पेपर काढावा, ट्रे खाली उतरून ठेवावेत. सुमारे १६-२४ दिवसांत रोपांची पुनर्लागवड करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post