गहू
बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली, तरी ऊस तोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकाची लागवड उशिरा करावी लागते. बागायत गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र, काही ठिकाणी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने एकरी १ क्विंटल उत्पादन कमी मिळते. गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी एनआयएडब्लू-३४, एकेएडब्लू-४६२७, फुले समाधान (एनआयएडब्लू-१९९४) या जातींची निवड करावी. एकरी ५० ते ६० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम कॅप्टन किंवा थायरमची प्रक्रिया करावी. त्यानंतर १५ मिनिटांनी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळीत १८ सें.मी. अंतर ठेऊन रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी दक्षिणोत्तर करावी. गव्हाची पेरणी उभी-आडवी न करता, एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोपे जाते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा, म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंद आणि ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.