केळी कंदकुजव्या (रोगकारक जिवाणू: पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोवोरम) व्यवस्थापन

 केळी

कंदकुजव्या (रोगकारक जिवाणू: पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोवोरम) 

रोगाचा प्रादुर्भाव पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. मात्र, एक ते तीन महिन्याचे पीक रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडते. कंदासोबत कोवळ्या मुनव्यावरही रोगाची लक्षणे आढळतात. कंदाचा वरील भाग कुजून झाडाचे पोषण व्यवस्थितरीत्या होत नाही. पाने अचानक वाळून जमिनीकडे लोंबू लागतात. प्रादुर्भावग्रस्त कंदांना खूप कमी मुळे फुटतात. मुळांचा टोकाकडील भाग काळा पडून संपूर्ण मुळे कुजतात. झाडाचा आधार नाहीसा झाल्यामुळे, हलक्या धक्क्याने झाडे कोसळतात. झाड उपटण्याचा प्रयत्न केल्यास फक्त झाडच हातात येते, कंद जमिनीतच राहतात. कंद कापून पाहिल्यास, तपकिरी रंगाचा झालेला असतो. त्यात पोकळ्या निर्माण होतात. रोगाच्या अतितीव्र अवस्थेत झाडाचा पोंगा जळून जातो. अशा झाडांना घाण वास येतो. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास, झाडाची योग्य निसवण होत नाही. घड आणि केळी लहान आकाराची होतात. 

🛡️ व्यवस्थापन

👉 लागवडीपूर्वी उन्हाळी खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. 

👉 लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत. 

👉 कंद लागवडीपूर्वी, कॉपर ऑक्सीक्लोराईड ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात ३० मिनिटे बुडवावेत. 

👉 चांगले कुजलेले शेणखत १० किलो प्रति झाड वापरावे. 

👉 लागवडीवेळी जमिनीत ब्लिचिंग पावडर ६ ग्रॅम प्रति झाड द्यावी. एक महिन्याच्या अंतराने पुन्हा हीच प्रक्रिया करावी. 

👉 रोगट झाडे कंदासह उपटून नष्ट करावीत. रोगग्रस्त झाडाचे अवशेष बागेबाहेर काढून बाग स्वच्छ ठेवावी. 

👉 योग्य प्रमाणात पाणी देऊन बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. 

👉 पिकाची फेरपालट करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post