पशु संवर्धन :-
पशुप्रजननामध्ये जनावरांचा माज ओळखणे ही एक महत्त्वाची बाब आहे. माजाची सर्व प्रकारची लक्षणे माहिती असल्यास पशुपालक कालवडीचा माज सहज ओळखू शकतात. सर्वसाधारणपणे योग्य आहार, व्यवस्थापन केलेल्या कालवडी स्पष्ट व नियमित माज दाखवितात. माज ओळखून वेळेत कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणेची शक्यता जास्त असते.
🐄 माजाची प्रमुख लक्षणे
👉माजावर आलेली कालवड अस्वस्थ, बेचैन होते, वारंवार हंबरते, कान टवकारते, गोठ्यात फिरण्याचे प्रमाण वाढते.
👉खाणे-पिणे रवंथ यावर लक्ष नसते, भूक मंदावते.
👉माजावर आलेल्या कालवडीचा योनिमार्ग लालसर ओलसर सुजल्यासारखा दिसतो.
👉योनीमार्गातून पारदर्शक काचेसारखा स्वच्छ चिकट स्राव/ बळस/ सोट बाहेर लोंबकळू लागतो किंवा खाली पडतो.
👉माजावर आलेली कालवड शेपटी उंचावून एका बाजूला करते.
👉सपष्ट माजावर आलेली कालवड कळपातील वळूकडे आकर्षित होते, त्याच्याजवळ जाऊन लगट करण्याचा प्रयत्न करते.
👉माजावर आलेली कालवड माजाच्या सुरवातीच्या काळात दुसऱ्या जनावरांवर उड्या मारते, परंतु माजाच्या मधल्या काळात दुसरी जनावरे पाठीमागून उड्या मारत असतील तर माजावर आलेली कालवड स्थिर उभी राहते. याला ‘खडा/पक्का माज’ म्हणतात.
👉काही संकरीत गाईंमध्ये तिसऱ्या-चौथ्या दिवशी योनीमार्गातून थोडा रक्तस्राव दिसून येतो.
🐄 माजावरील कालवडीमध्ये कृत्रिम रेतन
👉साधारणपणे कालवडीचा माजाचा कालावधी १८ ते २४ तासांचा असतो.
👉कालवडीमध्ये माजाचा मध्य किंवा उत्तरार्ध म्हणजे पक्क्या/खड्या माजाच्या कालावधीत कृत्रिम रेतन करून घेतल्यास गर्भधारणेची शक्यता जास्त असते.
👉ढोबळमानाने सकाळी माजावर आलेल्या कालवडीला त्याच दिवशी संध्याकाळी आणि संध्याकाळी माजावर आलेल्या कालवडीला दुसऱ्या दिवशी सकाळी कृत्रिम रेतन करावे.