टोमॅटो
पुनर्लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, मध्यम काळी किंवा पोयट्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू हा ६ ते ७.५च्या दरम्यान असावा. जमिनीतून जास्तीच्या पाण्याचा आणि क्षारयुक्त पाण्यातील क्षारांचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी जमिनीत चर काढणे आवश्यक आहे. अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय पिके म्हणजेच वांगी, मिरची, बटाटा ही पिके घेतलेली नसावीत. त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. तसेच सूत्रकृमी असणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. रोपांची लागवड सरी-वरंबा किंवा गादीवाफ्यांवर ठिबक सिंचन पद्धतीने करावी. टोमॅटो पिकाच्या पुनर्लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी. जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्या वेळी ८ टन प्रति एकरी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्या, लव्हाळा गाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात.